मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांपैकी ८ हजार ६२९ अनुयायांवर तीन दिवसांत उपचार करण्यात आले, असा दावा पालिकेने केला आहे. यामध्ये ३ हजार ५३६ पुरुष, ३ हजार २३६ महिला आणि १६३ बालकांचा समावेश होता.
महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व प्रमुख रुग्णालये यांच्याद्वारे ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधी दरम्यान ३ ठिकाणी तात्पुरते वैद्यकीय उपचार कक्ष सुरु करण्यात आले होते. यामध्ये चैत्यभूमी, शिवाजी पार्क, सूर्यवंशी सभागृह या तीन ठिकाणांचा समावेश होता. या तिन्ही ठिकाणी ६ हजार ९३५ अनुयायांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. याच कालावधीत पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील पालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांच्या निवा-याची व्यवस्था करण्यात आली होती. या शाळांच्या लगतच्या परिसरातील ११ मनपा शाळांमध्ये देखील वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या शाळांमध्ये निवाऱ्यास असणाऱ्या अनुयायांपैकी १ हजार ६९४ अनुयायांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. यामध्ये ८३४ पुरुष, ८३३ महिला आणि २७ बालकांचा समावेश होता. वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व ‘प्रमुख रुग्णालये’ येथील १४३ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ६९ डॉक्टरांसह ७४ नर्स, सहाय्यक इत्यादी मनपा कर्मचा-यांचा समावेश होता. उपचार घेण्यासाठी आलेल्या बहुसंख्य रुग्णांना सर्दी, अंगदुखी चा त्रास होता, असे पालिकेचे म्हणणे आहे.