मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनी बुधवारी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने चैतन्य भीमसागर उसळला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून दलित बांधव, कष्टकरी वर्ग, विविध स्तरातील भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. ओखी वादळाच्या धास्तीमुळे ही संख्या कमी होईल, असा अंदाज असताना बाबासाहेबांच्या अनुयायांसमोर ओखी वादळ ही शांत झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती. काखेला गाठोडे, कंबरेवर तान्हे मूल, हातात निळे झेंडे, मुखी बाबासाहेबांचा जयघोषांने दादर परिसर दणाणून गेला होता. कुटुंबांसह आलेल्यांच्या अनुयायांच्या चेहऱ्यावर जराही थकव्याचा लवलेशही दिसत नव्हता. दरम्यान, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी बाबासाहेबाना अभिवादन करण्यास दादर चैत्यभूमी येते येत असतात. यावर्षी सोमवारी ४ डिसेंबर पासून मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु झाला होता. पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाला होता. मात्र तरीही महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातून तसेच आंध्रा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी भागातून छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांचीही पावले चैत्यभूमीच्या वाटेवर वळली होती. काही २० ते २५ वर्षापासून नित्यनेमाने येणारे अनुयायीही होते. दादर रेल्वेस्टेशन ते शिवाजीपार्क- चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. दी बुध्दीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या शाखांच्या स्वयंसेवकांनी व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी अनुयायांच्या रांगेविषयी शिस्तबध्दता राखली होती. मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय, फिरती शौचालये आदी पुरेसा सुविधा पुरवल्याने कोणतीही अडचणी आल्याच्या तक्रारी नव्हत्या. बेस्टनेही सुविधा पुरवण्यास कुचराई केली नव्हती. इंदूमिलवर लवकरच आंबेडकरांचे स्मारक उभे राहणार, असा छातीठोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यामुळे यंदा आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत अनुयायांना उत्सुकता लागून होती. परंतु, सरकारच्या पोकळ आश्वासनांच्या घोषणांव्यतिरिक्त येथे काहीही न दिसल्याने अनेकांनी शिव्यांची लाखोली. तसेच फडणवीस सरकार निषेध करण्यात आला.
चैत्यभूमी व शिवाजीपार्क परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौत्तम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूमहाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांची पदपथांवरुन विक्री सुरु होती. आंबेडकर, गौत्तम बुध्द यांच्या प्रतीकृती, छायाचित्र ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. मागील दोन दिवसांपासून येथे मुक्कामास असलेल्यांना विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था केली होती. अभिवादनासाठी रांगेने उभ्या असलेल्या अनुयायांकरिता पालिकेने उत्तम सोयी- सुविधां पुरविण्यात आल्या. चैत्यभूमीवरील शिस्तबध्द असलेली गर्दी अथांग सागराला लाजवेल अशीच होती. चैत्यभूमी परिसरात विविध संस्थांच्यावतीने ध्यान धारणा केंद्र, मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याचे दिसून येत होते. तसेच शिवाजी पार्क मैदानाजवळील पदपथावर अनेक कलाकारांनी डॉ. बाबासाहेबांवरील गाणी सादर करण्यात आली.
वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ओखी वादळाच्या धोक्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समुद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंतच्या परिसर अगोदरच फेरीवालामुक्त झाला असला तरी अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही, याची पालिकेने दखल घेतली होती. रस्त्यांवरील पार्किंग व्यवस्था ही बंद ठेवण्यात आली होती. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीवर स्वच्छता राखण्यास साफसफाई अभियान राबवले.
या मान्यवरांनी केले अभिवादन
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार भाई गिरकर, आमदार शरद रणपिसे, आमदार अबू आझमी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, विरोधी पक्ष नेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षा समिता कांबळे, पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जऱ्हाड, संजय निरुपम, राजू वाघमारे, माजी मंत्री चंद्र्कांत हंडोरे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर.