मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर येणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सेवा-सुविधांत वाढ केली जाणार आहे. तसेच विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासनाने सतर्क व सुसज्ज राहावे, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयात पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, एमएमआरडीए, पोलिस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल, विविध सामाजिक संघटना यांचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुरविण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांचा आढावा घेतला. दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱ्हाड, उप आयुक्त नरेंद्र बर्डे, उप आयुक्त रमेश पवार, उप आयुक्त सुनिल धामणे, संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, भंन्ते करुणानंद थेरो, साधनानंद थेरो व राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, उपाध्यक्ष रवी गरुड, सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर संबंधित संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होतात. त्यांना दरवर्षी नागरी सेवा-सुविधा महापालिका मागील सतरा वर्षांपासून पुरवत आहे. यंदा त्यात अधिक वाढ केली जाणार आहे. दरम्यान, विविध संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या सुचनांची पडताळणी केली जाणार असून त्या अंमलात आणण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात वेगवेगळया ठिकाणी फिरती शौचालये, रांगेत उभे असणाऱ्या अनुयायांसाठी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारा अनुयायी शिस्तबद्ध असतो. तेव्हा प्रत्येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्यात यावी. स्वच्छतेच्या अनुषंगाने सुमारे १५३५ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचाऱ्यांवर ताण पडू नये, यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ आठ तासांवरुन सहा तास करण्यात आली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय याठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, वंदनीय भंन्तेजी यांच्यासाठी भारत स्काऊटचे गाईड येथे निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात ७ माहिती कक्ष, निरीक्षण मनोरे, ११ रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्कीट टीव्ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, ८ बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, विद्युत व्यवस्था (३५० टयुबलाईटस्, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लास्टीक खुर्च्या, ३०० लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉईंटस्, २६० फिरती शौचालये, २६० स्नानगृह, २ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी व जलसुरक्षा, शिवाजी पार्क येथे ४६९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३२० नळांची व्यवस्था, १५ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ.मी. वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, बसण्यासाठी ५० बाकडे या सुविधांचा प्रामुख्याने यात समावेश केला आहे. तसेच अनुयायांसाठी वैद्यकीय मदत व सहाय्य देण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत डॉक्टरांची संख्या अधिक करण्याचे सांगितले. कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्यवस्था, अनुयायी ज्या-ज्या स्टेशनवर उतरतात, त्याठिकाणी सकृतदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्यभूमीवर जाणारी बस क्रमांकासह नोंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.