मुंबई : राज्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.
या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी विशेष अनुदान दिले जाते. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास आणि निर्वाहासाठी एकूण ६० हजार रुपये देण्यात येणार आहे. तर इतर महसूल शहरातील, विभागीय शहरातील व उर्वरित “क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ५१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. व उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये या प्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल. तरी या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी त्वरित शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त,समाज कल्याण मुंबई शहर प्रशासकीय इमारत 4था मजला, आर.सी.चेंबूरकर मार्ग, चेंबूर मुंबई- ४०००७१ दूरध्वनी क्रमांक. ०२२-२५२७५०७३ या कार्यालयात संपर्क साधावा.