मुंबई, (निसार अली) : भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मालाडमध्ये ‘राष्ट्रनिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’च्यावतीने आगळा वेगळा कार्यक्रम झाला. यावेळी डाॅ. आंबेडकर यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आल्या. या कार्यक्रमात बाबासाहेबाच्या सहवासाबाबत पुर्वजांनी सांगितलेल्या आठवणी वारसांनी जाग्या केल्या. राज्यात प्रथमच झालेला हा कार्यक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.
देशातील अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी झटणार्या डाॅ. आंबेडकरांना मराठा, ब्राह्मण, राजे महाराजे यांसह इतर जाती धर्मातील लोकांचे सहकार्य मिळाले होते. यामुळे या सहकार्यांनाही त्यांच्या समाजाकडून जातीबाहेर टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तरीही डाॅ.आंबेडकर यांचे मानव मुक्तीच्या कार्याने भरावून गेलेले इतर समाजातील सहकारी यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांची साथ सोडली नाही. ऐवढेच काय डाॅ.आंबेडकर यांचे दिल्लीत निधन झाल्यानंतर मुंबईतील दादर येथील डाॅ.आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपली मालकी जागा देणारे दानशूर व्यक्ती डाॅ.भागोजी किर होते. अशाप्रकारे विविध जाती धर्मातील अनेक सहवासातील सहकार्यांनी डाॅ.आंबेडकर यांना तन, मन, धनाने सहकार्य केले. परंतु आजपर्यंत आंबेडकरी जनतेपर्यंत या सहकार्यांचे योगदान आंबेडकरी जनतेपर्यंत कधी पोहचले नव्हते. ते सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचण्याचे काम खर्या अर्थाने या कार्यक्रमातून झाले.
राष्ट्रनिर्मांते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक एफडीअाय आयुक्त हर्षदिप कांबळे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले . मालाड पश्चिम येथील निधीवन ग्राऊंड, पवन बाग चिंचोली बंदर येथे हा कार्यक्रम झाला. डाॅ.आंबेडकर यांना ना.म जोशी, दादासाहेब दोंदे, राव बहादूर केशवराव बोले, देवराव नाईक, सुरबानाना टिपणीस, भाई अनंत चित्रे, शां. शं. रेगे, बाबुजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील, सिताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे,चंद्रकांत अधिकारी, विनायक गणपत राव, बाळ साठे, केळूस्कर गुरूजी, केशव सिताराम ठाकरे तसेच महाराजा सयाजी राव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम यांचे सहकार्य लाभले. या सहकार्यांच्या वारसांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय संविधान इंग्रजी आणि मराठीत तोडपाठ असलेले ‘भारतीय संविधान कन्या मनश्री आबेतकर’ आणि आंबेडकराच्या सहवासातील वारसांना शोधून त्यांच्यांवर लिखाण करणारे लेखक योगीराज बागूल यांचा हर्षदिप कांबळे यांनी विशेष सत्कार केला.
कार्यक्रमात डाॅ.आंबेडकर यांचे ग्रथपाल म्हणून काम पाहणारे शांताराम रेगे यांचे वारस उमेश रेगे यांनी सांगितले की, “डाॅ.आंबेडकर यांचे ग्रथावर फार प्रेम होते. त्यांचे वाचन प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. ग्रंथालयात कोणतीही पुस्तके मिळाली पाहिजे असा बाबासाहेबांचा उद्देश असायचा. पिपल्स एज्युकेशन संस्था स्थापन झाली तेव्हा सिध्दार्थ काॅलेजमध्ये बाबासाहेबानी शांताराम रेंगे यांचीच ग्रंथपाल म्हणून नेमणूक केली होती. बाबासाहेबावर बोलायला ग्रंथपाल रेगे यांना आवडत असे. यासाठी कुठलीही तयारी न करता ते बाबासाहेबाविषयी बोलत असत.”
“समाजाला जोडणारे संविधान निर्माण करून देशात स्वतंत्र, समता, बंधूता आंबेडकरांनी प्रस्थापित केली. आंबेडकरांव्यतिरिक्त कुणी असते, तर मला नाही वाटत अशा प्रकारचे देशांत संविधान निर्माण झाले असते,” असे परखड मत जेष्ठ समाजसेविका तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केले. तिस्ता यांचे आजोबा चितामणलाल यांनी डाॅ.आंबेडकर यांच्यासोबत बहिष्कृत भारत या संघटनेची स्थापना केली आणि मुंबईतील दादर येथील दामोदर हाॅलमध्ये चिमणलाल यांना आंबेडकरानी अध्यक्षपद बहाल केले. पुढे याच संघटनेने १९२५ साली सोलापुरात मगासवर्गीय मुलांसाठी पहिले वसतीगृह उभारले.
डाॅ.आंबेडकर यांना केळूसकर गुरुजींनी केलेल्या सहकार्याविषयी आजही आंबेडकरी समाजात दुमत आहे. परंतु या कार्यक्रामात केळूसकर यांचा नातू हेमंत मनोहर केळूसकर यांनी आपले आजोबा आणि आंबेडकर यांच्यात झालेल्या सहवासातील आठवणीला उजाळा दिला. यावेळी हेमंत केळूसकर यांनी सांगितले की ,” १८५८ मध्ये आजोबा केळूसकर गुरु यांनी बौध्द चरित्र लिहिले. यानंतर बाबासाहेब यांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून सयाजी गायकवाड यांच्याकडे घेवून गेले.”
पुढील सहकारी अप्पासाहेब पाटील यांचे वारस गौतम पाटील यांनी सांगितले की, “माझ्या आजोबांनी फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर आपले संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांच्यावर बाबासाहेबांचा विशेष करिष्मा होता. ते सतत बाबासाहेबांच्या चळवळीत अग्रेसर असत. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहामध्येही ते सहभागी होते.” याचप्रकारे मी नगरसेवक असलेल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात दलित वस्त्या आहेत. तो माझा हक्काचा वाॅर्ड बनल्याचे मनोगत अप्पासाहेब पाटील यांचे वारस गौतम पाटील यांनी यावेळी केले.
लेखक योगीराज बागूल यांनी अपल्या मनोगतात सांगितले की, “या सर्व वारसांचे कौतुक आणि सत्कार पुर्वीच व्हायला पाहिजे होता. परंतु काळ आणि वेळ आल्यावरच घटना घडतात. आंबेडकर यांच्या सहवासातील वारसांना शोधण्यासाठी १२ वर्षे लागली. त्यांना शोधण्यासाठी २००५ साली सुरुवात केली. त्यांच्या पुर्वजानी भयंकर वेदना, यातना भोगल्या आहेत. यांच्या एका एका व्यक्तीवर ग्रंथ तयार होईल, एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे आंबेडकर यांच्या अठवणीचा साठा आहे.”
कार्यक्रमाला सनदी अधिकारी किशोर गजभिये, हर्षदिप कांबळे यांच्या पत्नी रोजाना कांबळे, रमेश कटके, अरविंद जगताप, राहूल भंडारी आणि आंबेडकरी जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.विजय कदम यांनी केले तर विशेष परिश्रम सुनिल मोहिते, विजय जाधव आणि समितीचे स्वयंसेवक म्हणून कामकाज पाहिले.