पणजी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धानंतरचे पहिले वैज्ञानिक विचारवंत असल्याचे वल्लभ गांवस देसाई यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्र आणि दलित संघटना गोवा यांनी घेतलेल्या व्याख्यानावेळी ते बोलत होते. शिक्षक, पत्रकार, वकील तथा विचारवंत असलेले गांवस देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित संघटना गोवाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर हे होते.
डॉ.आंबेडकर हे सर्वगुण संपन्न, विद्वान, प्रकांड पंडित, तेजस्वी, स्वयंभू, निश्चयाचा महामेरू होते. नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ते असल्याचे देसाई म्हणाले. आंबेडकर हे कोणत्याही गोष्टीचा विचार हा वैज्ञानिक दृष्टीकोनातून करत असत असेही ते म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला विठ्ठल मंदिरातील दर्शनापासून परावृत्त केल्याचे सांगताना त्यातून त्यांचा स्वाभिमान दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या काळातील सर्व नेत्यांमध्ये ते बुद्धीने व कर्तृत्वाने मोठे असल्याचेही देसाई म्हणाले. तसेच आंबेडकर हे मोठे अर्थतज्ज्ञ असल्याचेही त्यांनी सांगितले. अस्पृष्यांना हिंदू धर्मात स्थान मिळविण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे झगडा दिला. त्यांच्या इतकी मोठी चळवळ इतर कोणत्याही नेत्यांने उभारली नाही असेही ते म्हणाले. तसेच डॉ.आंबेडकर हे फक्त दलितांचे नाही तर संपूर्ण देशाचे नेते होते. भारताचे भूषण होते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले. तसेच एक अर्थतज्ज्ञ, लेखक या सोबतच ते एक चांगले वाचक असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमावेळी अश्विनी मोचेमाडकर, समर्थ नाटेकर आणि सुभाष बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले.