
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर,कालिदास कोळंबकर, प्रकाश गजभिये,विभागीय आयुक्त जगदीश पाटील, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व संविधानानुसार आम्ही काम करीत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व संविधानानेच भारत जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो.
मुख्यमंत्री यांच्या हस्ते डिसेंबर-2018 च्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला यावेळी भेट दिली















