नागपूर : चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण १०० टक्के झाले आहे. स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतची लक्षवेधी सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. २५ एप्रिल 2018 ला साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो, मात्र या परिसरात हे बांधकाम येत नाही. यालाही केंद्र शासनाची मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.स्मारकाचे बांधकाम जोत्यापर्यंत आले आहे. पैशाची कोणतीही अडचण नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात १५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. लागेल तेव्हा आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्मारकाचे काम हे आराखड्याप्रमाणे व संकल्पनेनुसार करण्यात येणार असून विधिमंडळाचे सदस्य आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसमोर याबाबत सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार आणखी बदल करण्यात येईल. शिवाय स्मारकाचे दर्शन सी लिंकवरूनही व्हावे, अशी व्यवस्थाही करण्यात येईल, यासाठी नियमित पाहणी करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य भाई जगताप, किरण पावसकर, संजय दत्त, ॲड. जयदेव गायकवाड यांनी सहभाग घेतला.