
रत्नागिरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज उद्घाटन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिपप्रज्वलन करुन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सप्ताहाचे उदघाटन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत प्रमुख पाहुणे म्हणून तसेच सहाय्यक समाज कल्याण अधिकारी ए.एस. बन्ने, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर.आर. कागणे, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, याकरिता ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचं अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी यावेळी सांगितलं . प्रशासकीय अधिकारी व महामंडळाचे व्यवस्थापक यांनी देखील त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्यापक प्रसिध्दी देऊन त्या सर्वसामान्यपर्यंत पोहचविणे व त्या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बन्ने यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.