रत्नागिरी : मुंबईतल्या डोंगरी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ही इमारत नेमकी कोणाच्या अखत्यारीत येते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती सुरुवातीला आली. मात्र ही इमारत म्हाडाची नसल्याचं म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. ही इमारत अनधिकृत असून एका ट्रस्टने ही इमारत बांधली होती. मात्र इमारतीची जागा नेमकी कोणाची आहे, ती तिथे उभी कशी राहिली याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल. तसेच ही अनधिकृत इमारत म्हाडाच्या जागेवर असेल आणि यामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा दोष असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच म्हाडाच्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करू, आणि अशा इमारती राहण्यास कितपत सक्षम आहेत याबाबत माहिती घेऊ आणि कारवाई करू असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.