रत्नागिरी, (आरकेजी) : गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाचलेले पर्यटक औरंगाबादचे आहेत.बालाजी उत्तम घाडेकर, सुरेश जगन्नाथ घाडेकर अशी दोघांची नावे आहेत. फुलंबरी तालुक्यातील मारसावळे गावचे ते रहिवासी आहेत.
पोहत असताना दोन पर्यटक समुद्रात बुडू लागले. याचवेळी आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा केला. यानंतर तातडीने जीवरक्षक राज देवरूखकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्रात धाव घेतली. त्यांनी दोघाही पर्यटकांचे प्राण वाचविले.
दरम्यान, पावसाळा सुरु असल्याने समुद्रात जाणे धोक्याचे असते. समुद्रकिनारी धोक्याचे सुचना फलकही लावलेले आहेत. त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.