डोंबिवली : तिरुपती येथे जाऊन बालाजींचे दर्शन घेणे शक्य नाही अशा भाविकांसाठी साक्षात भगवान तिरुपती बालाजींचे दर्शनच नाही तर तिरुपती येथे होणाऱ्या यथासांग आष्टविधी पूजेचा यथासांग सोहळा पहावयास मिळणार आहे. शनिवार दि. 1 डिसेंबर रोजी डोंबिवलीत आयोजित श्रीनिवास मंगल महोत्सवात सोहळा होणार यावर्षी श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या आयोजनाचा मान डोंबिवली परिसराला मिळाला आहे. महापलिकेच्या ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात मंगल सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या सोहळ्यात तिरुपती बालाजी येथे नियमित होणारे पूजा अर्चा व इतर धार्मिक विधी, शोभायात्रा, देवाचा विवाह सोहळा व महाप्रसाद असे संपूर्ण दिवसभर कार्यक्रम नागरिकांसाठी विनमुल्य असणार आहे.
या मंगल महोत्सवामध्ये देवदेवतांचे फोटो असलेले विद्युत देखावे डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे घरडा सर्कल तसेच डोंबिवली स्टेशन पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हे सर्व देखावे व विद्युत रोषणाई चेन्नईहून येणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिरुपतीहून देव कल्याणफाटा मार्गे बालाजी मंदिर सागर्ली येथे आणण्यात येणार आहेत. या मंगल महोत्सवामध्ये शनिवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 पासून सुप्रभात, तोमाला सेवा, सकाळी 10 ते 12 कुंकुमार्चनम, तसेच तुलाभार करण्यात येणार आहे. यावेळी या वर्षामध्ये विवाह झालेल्या सुमारे एक हजार जोडप्यांना अभिषेकाचा मान मिळणार आहे. या नववधूंना चांदिचे मंगळसुत्र प्रसाद स्वरुपात देण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 6 पर्यंत श्रीनिवास मंगल महोत्सवाची भव्य शोभायात्रा विठ्ठल मंदिर आयरे रोड पासून स्वामी विवेकानंद शाळा – दत्तनगर चौक – संगीतावाडी मार्गे मानपाडा रोड – चार रस्ता – टिळक चौक – शेलार नाका ते घारडा सर्कल पासून सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल अशी शोभणारी काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध जाती – धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आप आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, उत्तरभारतीय समाज, दक्षिणेतील सर्व समाजातील बांधव सहभागी होणार आहेत. त्यामध्ये तेलगु, कानडी, केरळीय, मल्याळी समाजातील बांधव सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे बार्शीहून शंभर बाळ वारकरी, यक्ष ग्रुप तर्फे विविध बहुरूपी कलाकार सहभागी होणार आहेत. ढोल पथक, लेझीम पथक, नाद स्वरमचे तुतारीवाले शोभायात्रेची भव्यता वाढविणार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय, श्रीसदस्य, आयप्पा सेवा मंडळे, जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज शिष्यगण, धन निरंकारी सेवेकरी, अनिरुद्ध बापू शिष्यगण त्याचप्रमाणे विविध जाती धर्मातील भाविक सहभागी होणार आहेत.
या मंगल महोत्सवामध्ये सायंकाळी 6 ते 9 दरम्यान तिरुपती बालाजींचा चा भव्य दिव्य विवाहसोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या मंगल महोत्सवामध्ये सुमारे अडीच लाख नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांनी दिली.