डोंबिवली : हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी धडपणाऱ्या दिग्गज कलाकाराच्या प्रेरणेतून डोंबिवलीत कलेच्या माध्यमातून अनोख्या कार्यक्रमाचा आनंद डोंबिवलीकरांना घेता आला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नवोदित हौशी कलाकारांनी गुरूस्पर्श व्यक्तिचित्र संकल्पनेतून प्रथमच मॉडेल म्हणून बारा गुरु, बारा कलाकार आणि त्यासाठी फक्त बारा तास अशी अनोखी गुरुवंदना सादर केली.
प्रमुख कलाकार तथा डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक चित्रकार प्रभू कापसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कला प्रकारातील कलाकारांनी एकत्र यावे. त्यांचे काम लोकांना बघता यावे आणि एका व्यासपीठावर कलाकार यावेत या हेतूने डोंबिवलीकर आर्ट सोसायटीची स्थापना होवून `डोंबिवलीकर आर्ट सोसायटी’च्या संकेतस्थळाचे प्रकाशन शिल्पकार प्रमोदजी कांबळे यांच्या शुभहस्ते झाले होते.
डोंबिवलीकर आर्ट सोसायटी व संस्कार भारती यांच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी वीर सावरकर उद्यान डोंबिवली पूर्व येथे चित्रकला सराव वर्ग नियमित घेतला जातो. सर्व कलाकार एकत्र येऊन समोर मॉडेल बसवून स्केच पोर्ट्रेट करतात. गुरुपौर्णिमेच्या धर्तीवर काहीतरी अनोखा उपक्रम म्हणून बारा गुरु, बारा कलाकार आणि त्यासाठी फक्त बारा तास अशी संकल्पना साकार झाली.
रविवारी महापालिकेच्या आनंद बालभवन सभागृहात गुरूवर्य वामनराव देशपांडे, समीर अभ्यंकर, प्रमोद शिरबाविकर, अश्विनी साने, गुलाब पाटील, बलवंत वखारीया, वैशाली दुधे, पांडुरंग भागवत, राजन धोत्रे, नरेंद्र दिवाने, अजित करकरे, विकास काटदरे या विविध क्षेत्रातील गुरूंचे व्यक्तिचित्रण श्रीकांत कशेळकर, मनोज पतुरकर, उदय पळसुलेदेसाई, मुकेश चौधरी, प्रभू कापसे, रवी वेंगुर्लेकर, केतन राणे, विनय मुकादम, प्रभाकर कोशे, प्रकाश नार्वेकर, प्रतिक रिसबूड, जगदीश येवला या कलाकारांनी अनोख्या गुरुस्पर्श संकल्पनेतून व्यक्तिचित्रांचे रेखाटन पाहून कलारसिकांना मनापासून दाद दिली.