
डोंबिवली : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केले.मात्र कट्टर शिवसैनिक आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असून किती गेले तरी चालतील पण त्याच्या दुप्पट निवडून आणू असा विश्वास ठाकरे यांना दिला.काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शिवसैनिकांनी मातोश्रीला जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंबिवलीतील २०० पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र मातोश्रीला पाठवले आहे.
माजी नगरसेवक उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, जेष्ठ शिवसैनिक तात्या माने, उपशहरप्रमुख विवेक खामकर, अरविंद बिरमुळे, किशोर मानकामे, कार्यालयप्रमुख सतीश मोडक,अभिजित थरवळ, अभय घाडीगावकर , कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गांवड, शहर संघटक मंगला सुळे, महिला संघटक शिल्पा मोरे, ममता घाडीगावकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दिले. याबाबत उपशहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील समस्या , नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे कामे सुरु ठेवली आहेत. जे कट्टर शिवसैनिक आहेत ते शिंदे गटाकडे ढुंकूनही पाहत नाहीत.शिवसैनिक हा कायम जनतेसाठी रस्त्यावर उतरतो.राजकारणाकडे शिवसैनिक लक्ष देत नाहीत. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार `८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण` हे लक्षात ठेवून जनसेवा करत आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र जनतेची सेवा करत रहाणे हे आम्हांला शिकविले आहे असे खामकर म्हणाले.तर दरेकर म्हणाल्या,मातोश्रीकडून लवकरच शिवसेना शहरप्रमुखाची नियुक्ती केली जाईल.जेष्ठ शिवसैनिक तात्या माने यांनी शिवसेनेसाठी कायम काम करत राहणार असल्याचे सांगितले.














