डोंबिवली, (प्रशांत जोशी) : राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ नये ,म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने गेले दोन महिने पूर्णतः लॉकडाऊनची घोषणा केली. परिणामी सर्वच व्यवहार बंद पडले. रेल्वे, मेट्रो, बस, टॅक्सी अशी प्रवासी वाहतूक बंद पडली. या प्रवासी बंद वाहतूकीमुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचे हाल झाले असून त्यांना जीवन जगणे कठीण होत आहे. पश्चिम डोंबिवलीत नेमाडे चौकात रिक्षा चालकांनी आपली व्यथा मांडली त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पश्चिमकडील नेमाडे रिक्षा स्टँड येथे आपली व्यथा मांडताना रिक्षा चालक सुरेश पवार सांगितले कि, गेले दोन महिने रिक्षा व्यवसाय बंद आहे. रिक्षा चालकांचे प्रपंच आज रस्त्यावर आला आहे. शासनाने आमच्यासाठी कोणतीही मदत दिली नाही. शासनाला विनंती आहे कि आमचे रस्त्यावर संसार आले आहेत. दोन महिन्यांपासून आमची बायका-पोर उपाशी आहेत. आधिच लाखो रिक्षा परमिट सोडल्याने रिक्षा चालक हवालदिल झाले होते. लोकांनी रिक्षा कर्जाऊ घेतल्या आहेत त्यांचे कर्जही थकीत झाले आहे. शासनाने आम्हाला मदत करावी. जेणेकरून आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये असे सर्वच रिक्षा चालकांना वाटत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि आमचे संसार वाचवावे ही विनंती आम्ही सर्व रिक्षा चालक करीत आहोत, असे ते म्हणाले.