डोंबिवली, (प्रशांत जोशी) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने महावृक्षारोपण अभियान मांगरुळ परिसरात उद्या (ता.५) राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी १५ हजार स्वयंसेवक व विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिक यात उत्स्फूर्त सहभाग घेणार आहेत. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात हा उपक्रम आगळावेगळा विक्रम ठरण्याची शक्यता आहे.
जागतिक तापमानवाढीची चिता पर्यावरणप्रेमींनी सतावत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी पृथ्वीवरील वनांच्या क्षेत्रात वाढ करणे, हा एकमेव पर्याय समोर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ येथील ८५ एकर जागेवर १ लाख वृक्ष लावण्याचे ठरविले आहे. आहे.
अभियानात नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील, दिव्यज्योती ट्रस्ट आदी सामाजिक संस्था तसेच, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील विविध शाळा, एनएसएसचे विद्यार्थी आणि शिक्षक, विविध संस्था, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला बचत गटातील महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयातील ६५० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून योगदान देणार आहेत.