
डोंबिवली : महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमातेमुळे डोंबिवलीत पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील प्रत्येक गल्लीत अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या ताब्यात असलेला स्कायवॉक अनधिकृत फेरीवाल्यांना आंदण दिला आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी निर्मित झालेल्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने आता रेल्वे प्रवाश्यांनी कोणत्या रस्त्याचा वापर करायचा असा प्रश्न रेल्वे प्रवासी व परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या गृहिणी विचारात आहेत.
शहरातील अनधिकृत फेरीवाल्यामुळे विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. अनधिकृत फेरीवाले आणि स्कायवॉकवर गर्दुल्ले यांच्यामुळे हाणामारीच्या घटना झाल्या आहेत. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे त्याचा राग धरून पालिका अधिकारी सुभाष पाटील यांच्यावर हल्लाही झाल्याची घटना घडली होती. यामुळे वातावरण तापल्यामुळे पूर्वेकडील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून फेरीवाले हटविण्यात तत्कालीन अधिकारी यशस्वी झाले होते. परंतु आता अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले पुन्हा बस्तान बसविले आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशन कल्याण दिशेकडील पादचारी पूल पाडण्यात येत असून तो मार्ग रेल्वे प्रवाश्यांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच स्टेशन परिसरातील म्हात्रे बिल्डिंग धोकादायक असल्याने तिचे पाडकाम सुरु असल्याने रेल्वे स्टेशन जवळील रस्ता बंद करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाश्यांना फक्त स्कायवॉक व मधुबन रस्ता हे दोन मार्गच स्टेशनवर ये-जा करण्यासाठी आहेत. हे दोन्ही मार्ग अनधिकृत फेरीवाल्यांनी काबीज केल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी कोणत्या रस्त्याचा वापर करायचा अशी विचारणा होत आहे. याबाबत महापालिका प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना विचारले असता उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. पालिका प्रभाग क्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी म्हणून नवनियुक्त झालेले अधिकारी भविष्यात अनधिकृत फेरीवाल्यावर कशी कारवाई करणार अशी विचारणाही डोंबिवलीकर करीत आहेत. स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ले आदीचे प्रमाण वाढले असल्याने वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा डोके वर काढणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
















