डोंबिवली(प्रशांत जोशी) : 40 आमदारांनी बंड पुकारून शिंदे गटात उडी मारल्यानंतर शिवसेनेतील राजकिय समीकरणे बदलत गेली. मात्र कट्टर शिवसैनिकांनी शिवसेना आमची आम्ही शिवसेनेचे असे म्हणत पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. या संदर्भात डोंबिवलीतील शेकडो शिवसैनिकांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर जाण्याआधी असलेली ठाणे ही शिवसैनिकांसाठी भिंत होती. आता ती तुटली आहे. त्यामुळे आता थेट मातोश्री आणि शिवसेना ही आमची हृदयातली भावना असल्याचे मातोश्रीवर जाऊन आलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत उपशहर प्रमुख विवेक खामकर, कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंड, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहर संघटक स्मिता पाटील, ममता घाडीगांवकर, अल्पा चव्हाण, अनिता मयेकर, उपविभाग प्रमुख अभय घाडीगांवकर, शिल्पा मोरे आदींसह अनेक शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान पक्षप्रमुख डोंबिवलीतील शिवसैनिकांनी चर्चा केली. यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जे शिवसेना सोडून गेले त्यांच्याबाबत विचार न करता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अन्य कुणालाही हिरावून घेता येणार नाही. सामान्य जनता शिवसेनेबरोबरच आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी डोंबिवलीकर शिवसैनिकांशी बोलताना व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती देताना उपशहर प्रमुख विवेक खामकर म्हणाले, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही कायम शिवसनेबरोबरच राहणार. आम्हाला मातोश्रीवरून जो आदेश येईल त्याचे पालन करू. तर संघटक वैशाली दरेकर म्हणाल्या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील शिवसैनिकांमधील ठाण्याची अडथळा ठरलेली भिंत तुटली आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे होते आणि राहणार. तर संघटक कविता गावंड म्हणाल्या, नगरसेवक, आमदार, खासदार हे काही वर्षांपुरते असतात. परंतु संघटना कायम राहते. आज शिवसैनिक आणि सामान्य जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. निवडणूक पुढे ढकला, असे म्हणणारे आता निवडणुका घेण्यास घाबरले की काय ? असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लगावला.
शिवसेना डोंबिवली शहरप्रमुखपदी नव्याने नियुक्ती होणार :
शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत शहरातच नव्हे तर शिवसैनिकांमध्येही चर्चा सुरू होती. मातोश्रीवर याबाबत माहिती दिल्यावर यावर लवकरच निर्णय घेऊ. नवीन डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख पदी नवीन नियुक्ती करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती विवेक खामकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख पदी इच्छुक शिवसैनिकांची चाचपणी सुरू असून लवकरच नवीन डोंबिवली शहरप्रमुख आपल्याला दिसेल असेही शिवसैनिकांनी सांगितले.