डोंबिवली, 17 मे (प्रशांत जोशी) : कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे. त्याचा फायदा घेत कोपर पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले व आज कल्याण दिशेकडील पादचारी उड्डाणपुलावर 8 गर्डर बसवण्याचे काम 4 तासात पूर्ण करण्यात आले.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूल 40 वर्षांपूर्वीचा धोकादायक झाल्याने पाडून टाकण्यात आला. मात्र, नवा पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक मिळत नसल्याने काम रखडले होते. 4 मीटर रुंद असलेला पूल वाढत्या गर्दीमुळे अपुरा ठरत होता. यामुळे पुलाची रुंदी 9 मीटर व लांबी सुमारे 70 मीटर करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने गर्डर तयार ठेवले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज 17 रोजी गर्डर बसविण्याच्या कामाला मजुरी दिली. त्या प्रमाणे आज सकाळ पासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली. 8 गर्डर बसवण्यासाठी सुमारे 50 ते 60 कर्मचारी, 250 टन वजनाच्या 2 क्रेन व 4 ट्रेलर सज्ज होते साधारण 10-30/11 वाजता गर्डर बसवण्यास प्रारंभ झाला व 2 वाजता आठही गर्डर बसवण्याचे काम विक्रमी वेळात पूर्ण झाले. आता उर्वरित काम तातडीने करून प्रवाशासाठी पूल खुला करून दिला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.