
डोंबिवली : गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरतील संपूर्ण सखलभाग जलमय झाला होता. दरम्यान उल्हासनदी प्रवाह आणि बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरपरिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. या समस्येमुळे चाळी, झोपड्यांमध्ये पाणी शिरून हजारो कुटुंबांचे आर्थिक तसेच मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या पूरग्रस्त कुटुंबाना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे डोंबिवली शहरप्रमुख अंकुश गायकवाड यांनी केली आहे.
शहरातील पश्चिम विभागातील अण्णानगर, कोपररोड, सिद्धार्थनगर तर पूर्वेकडील ज्योतीनगर, समता नगर, आयरे गांव, समता झोपडपट्टी येथील राहिवाशियांना मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या दोन्ही विभागात झोपडपट्टीमध्ये राहणारी कुटुंबे अतिशय गरीब परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. झोपडपट्टीमध्ये पाणी भरल्याने घरातील संपूर्ण सामान खराब झाले आहे. घरातील धान्य भिजल्यामुळे खाण्यापीण्याची पंचायत झाली आहे. त्या कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी म्हणून दोन-तीन दिवस त्या कुटुंबाची जबाबदारी सामाजिक संस्था आणि समाजसेवकांनी घेतली होती. परंतु आता पुढील व्यवहार कसा करायचा हा प्रश्न त्या कुटुंबांना सतावत आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांच्या घरांची पाहणी व सर्व्हे करून त्यांची नुकसान भरपाई शासनाने देणे गरजेचे आहे.
गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय होऊन नागरिकांची दैना उडाली. या पावसाच्या पाण्यामुळे घरातील चीज वस्तूंचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानबाबत मदत मिळण्यासाठी तहसीदार कार्यालयाने अर्जांचे वाटप डोंबिवलीतील विविध वस्त्यांमध्ये करण्यात आले. हे अर्ज पूरग्रस्त कुटुंबाने भरून द्यायचे आहेत. या अर्जासोबत पंच (साक्षीदार) यांचे वय, पत्ता या माहितीसोबत बँक खाते क्रमांक आय.एस.बी. कोड देणे बंधनकारक केल्याने हा सर्व पुरावा कागदपत्र सदर करणे पुराग्रस्तांना कठीण होत आहे. त्यामुळे संबंधित पुराग्रस्ताला मदत मिळणे कठीण होऊ शकते. म्हणून ज्या पुरग्रस्तांकडे रेशनकार्ड आहे अशा पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी अंकुश गायकवाड यांनी केली आहे.















