डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर म्हणून शहरातील ओळख असलेल्या दत्तनगर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी मनोभावे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ या गजराने वारकरी संप्रदायचे भक्तगण विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते.
आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वच भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने डोंबिवलीकरांची गर्दी आयरे रोडवरील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शिवसेना शहरप्रमुख तथा स्थानिक नगरसेवक राजेश, पांडुरंग पाटील, माधव पाटील, चेतन म्हात्रे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. कोकणातील कुडाळ येथील जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळचे माध्यमातून दादा परबबुवा यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांना राजेश मोरे यांनी फराळाची व्यवस्था केली होती. तर दिलीप बाळा चौधरी, नारायण घाडीगावकर, उमाशंकर बर्मा, संदीप विशे यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी चहाचे वाटप करण्यात आले. सकाळपासून मंदिरात विठ्ठ नामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते.
तर सांस्कृतिक वारसा जपत आपली संस्कृती टिकवण्यासाठी 22 वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या मढवी इंग्लिश स्कुल डोंबिवली शाळेतील 65 विद्यार्थ्यांनी दिंडी काढील होती. शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. प्रति विठ्ठल रखुमाईच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान बच्चे कंपनीने तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत घेतलेला सहभाग विलोभनीय होता.
यावेळी राजेश मोरे म्हणाले, पांडुरंगाला विनंती आहे कि सर्वांना आनंदात ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव हीच प्रार्थना आहे.
हरी ओम रेल्वे प्रवासी मंडळ गेली आठ वर्षे डोंबिवली रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक वर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मूर्तीची स्थापना करतात. यावर्षी ही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाटेस विठ्ठलाची पूजा करून पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होऊन भक्तांना प्रसाद देण्यात आला. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे पंढरपूरला न जाता विठ्ठलाचे दर्शन घेता आले.