डोंबिवली, (प्रशांत जोशी) : घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेचा शेजाऱ्याने डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केल्याची घटना बुधवारी घडली. सुनंदा प्रकाश लोकरे (45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातल्या ओम साई चाळीत राहत होती. या चाळीसमोरच राहणारा रविंद्र मसुरकर (35) या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकून गजाआड केले. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून काढलेला कचरा टाकण्यावरून सुनंदा आणि रविंद्र या दोघांत भांडण जुंपले. कुत्र्याने केलेली विष्ठा पाण्यावाटे वाहून आली आणि मसुरकर याच्या घरासमोर पडली. त्यामुळे वाद झाला. यानंतर संतापलेल्या रविंद्र याने घरातील लोखंडी रॉड आणून सुनंदा हिच्या डोक्यात घातला. परिणामी सुनंदा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हे पाहून हल्लेखोर रविंद्र याने तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत तिला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी सुनंदा हिला मृत घोषित केले. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी रविंद्र मसुरकर याला एका चाळीतून अटक करून गजाआड केले.