डोंबिवली, (प्रशांत जोशी) : डोंबिवलीतील औद्योगिक विभागामुळे प्रदुषणाचा त्रास नागरिकांना होत असतो. या त्रासापासून सुटका करण्यासाठी केमिकल उद्यागधंदे येथून हद्दपार व्हावेत अशी मागणी जोर धरीत होती. यावर उपाय म्हणून औद्योगिक विकास महामंडळ, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्रित फेज 1 व 2 मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची क्षमता वाढवून ते अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डोंबिवलीकरांची प्रदुषणापासून सुटका होणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयासाठी सुमारे ९५ कोटी खर्च होणार आहेत.
येथील औद्योगिक विभागातील फेज एक व दोन मध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे असून ती अपुरी ठरत आहेत. हे प्रदुषीत पाणी नाल्यात सोडण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यामुळे प्रदूषणाच्या तक्रारी येत असतात. मध्यंतरी काही कंपन्या हरित लवादाने बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे उद्योजकांनी वर्गणी गोळा करुन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची दुरुस्ती काही प्रमाणात केली होती. तरीही सदर काम हे पुरेसे नसल्याने दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अद्ययावत करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाने घेतला आहे. या कामासाठी सुमारे ९५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगीतले. या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे सी.एच.टु.एम या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. याबरोबर हे काम करण्यासाठी ठेकेदार नेमण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व कामासाठी अपेक्षित खर्च ९५ लाख असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराला हे काम देण्यासोबतच त्याला पाच वर्षे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालवण्यास देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खंबाळपाडा येथील नाल्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंदिस्त पाईपलाईन मार्फत मुंब्रा येथील खाडीत सोडण्यात येणार आहे. परंतु यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्याचा खर्च 100 कोटी अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याची योजना असून टेंडर प्रक्रिया सुरु असल्याने भविष्यात प्रदूषणापासून डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे.