
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : मुंबईच्या तुलनेत डोंबिवलीत अत्यंत स्वस्तात जागा मिळत असल्याने अनेक मोठे उद्योग कारखाने सुरु करण्यात आले. प्रामुख्याने उद्योगांना जागा व पाणी देण्याचा उद्देशाने औद्योगिक विकास मंडळाची स्थापना झाली. डोंबिवली औद्योगिक विभागात सध्या सुमारे 575 विविध लहान मोठे उद्योग असून या उद्योगाना सध्या विस्कळीत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. विशेष म्हणजे त्या 27 गावांना जादा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाल्याने उद्योगांचे पाणी कमी करुन ते घरगुती ग्रहकांना देण्याची योजना आहे. या निर्णयामुळे उद्योजक कमालीचे नाराज असून लवकरच ते उद्योगमंत्री सुभाष देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
डोंबिवली एम.आय.डी.सी. ची स्थापना 1960 साली करण्यात आली. औद्योगिक विभागात व्यापारी, औद्योगिक, निवासी असे विभाग आहेत. औद्योगिक विभागातील 575 कारखान्यापैकी सुमारे 50 ते 55 कारखाने बंद आहेत. गेल्या साठ वर्षात औद्योगिक विभागाने चांगली प्रगति केली व रोजगार दिला. मात्र आता पाणी टंचाईमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. आजही काही तांत्रिक कारणांमुळे औद्योगिक भागात पाणी पुरवठा बंद आहे. उद्योजक मात्र जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद करुन तो 27 गावांना करण्यात येत असल्याचा आरोप करीत आहेत. राज्य शासनाने ग्रोथ सेंटर स्थापन करण्यासाठी 10 गावांची निवड केली आहे. यामुळे येथे मोठे उद्योग येतील असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र जर पाणी पुरवठा होणार नसेल तर नवे उद्योग कसे येतील असा प्रश्न उद्योजक विचारत आहेत. औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यानीही सध्या औद्योगिक भागाला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत असल्याचे मान्य केले. उद्योजकांच्या ‘कामा’ या संघटनेचे सचिव देवेन सोनी यांना विचारले असता त्यानी उद्योगांना पाणी पुरवठा पन्नास टक्के कमी हेात असून दाबही कमी असल्याने उत्पादन पन्नास टक्के कमी होत असल्याचे मान्य केले. या सदर्भात उद्योजकाचे शिष्टमंडळ लवकचर उद्योगमंत्री सुभाष देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यानी सांगीतले.














