डोंबिवली, (प्रशांत जोशी) : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सकल मराठा समाज डोंबिवलीतर्फे शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. आज सकाळी डोंबिवलीतील चाकरमानी मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर शहर बंद करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कोणताही अनुचित प्रकार न होता डोंबिवलीकरांनी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे डोंबिवली संपूर्णपणे बंद होती.
सोमवारी सायंकाळी पूर्वेकडील इंदिरा चौकात सकल मराठा समाज डोंबिवलीतर्फे आत्मघाती निधन झालेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी डोंबिवली बंदचे डोंबिवलीकरांना आवाहन करण्यात आले होते. सकाळी 8.30 वाजेपर्यंत पूर्व-पश्चिम विभागात रिक्षा सुरु होत्या. परंतु त्या नंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मोर्चेकऱ्यांनी रिक्षा चालकांना तसेच दुकानदारांना बंदमध्ये सहकार्य करण्याच्या विनंतीला होकार दिल्यानंतर मात्र डोंबिवलीतील रिक्षा वाहतूक व दुकाने दुकानदारांनी बंद केली. नेहमी वाहतुकीची गजबजाट असणाऱ्या रेल्वे स्थानक शेजारील बाजारपेठ बंद होती. पूर्वेकडील केळकर रोड, राथ रोड, पाटकर रोड, मानपाडा रोड, स्वामी विवेकानंद रोड, आयरे रोड तर पश्चिमकडील महात्मा गांधी रोड, दीनदयाळ रोड, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, सुभाष रोड, जुनी डोंबिवली रोड, कोपर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र काही रिक्षा संघटनांनी बंदकडे दुर्लक्ष करून रिक्षा वाहतूक तुरळकपणे चालू ठेवली होती. बंदमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. चौका-चौकात बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते. शहरात अत्यावश्यक सेवा सुरु होती. शहरातील संपूर्ण शाळा सुरळीतपणे सुरु होत्या.