डोंबिवली, (प्रशांत जोशी) : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचे निधन झाले. या घटनेची दाखल घेऊन सकल मराठा समाज डोंबिवलीतर्फे पूर्वेकडील इंदिरा चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंदू परब, राजेश शिंदे, लक्ष्मण मिसाळ, सारिका चव्हाण, चंद्रशेखर शिंदे यांच्यासह समाजातील मान्यवर मंडळी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी “एक मराठा लाख मराठा”, काकासाहेब अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या. समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी एक दिवसीय डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आता राज्यभरात ठोक मोर्चा आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या या ठोक मोर्चाला कल्याण मध्ये बुधवार पासून सुरुवात होणार आहे. कल्याणमध्ये मराठा समाजाच्या वतीने तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत बुधवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद मध्ये डोंबिवलीतील कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलिसांनी बंद दरम्यान सार्वजनिक शांततेचा भंग होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या कलम १४९ ची नोटीस डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या सुमारे ३० प्रमुख कार्यकर्त्यांना बजावली आहे.