
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : गंगाराम सदन नावाची ४० वर्षे जुनी इमारत आज डोंबिवलीत कोसळली. पूर्वेकडील जुना आयरे रोडवर ही इमारत होती. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार दुपारी सव्वाएकच्या दरम्यान मोठा आवाज होऊन इमारत कोसळली. कोसळण्यापूर्वी इमारतीमधून माती पडत असल्याचे लक्षात तेथे असणारे नागरिक घाबरून बाहेर आले. घटना घडली त्यावेळी तळमजल्यातील स्वस्तिक लाँड्रीचा मालक कामानिमित्त बाहेर गेला होता. तसेच येथे राहत असणारे एक कुटुंब इमारत कोसळण्यापूर्वी सुखरुप बाहेर पडले.
पालिका सभागृहनेते राजेश मोरे, प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रामनगर पोलीस बळ, फायर ब्रिगेड जवान आदींनी घटनास्थळी भेट दिली. राजेश मोरे म्हणाले, पंडित केणे यांच्या मालकीची इमारत असून या इमारतीत कोणीही राहत नव्हते.














