मुंबई : विक्रोळी परिसरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत विक्रोळी परिसरात पसरली आहे. २२ दिवसांत २१६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत हे प्रकार कांजुरमार्ग, सुर्यनगर, कन्नमवार नगर, टागोर नगर येथे घडले आहेत. पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात या बाबतची नोंद झाली आहे.
श्वान दंश झाल्यानंतर आमच्याकडे त्यासंबंधीच्या लस आणि उपचार उपलब्ध आहेत, अशी माहिती पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी उषा शर्मा यांनी दिली.
पालिकेच्या कर्मचार्यांनी रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त घालणे गरजेचे आहे. येथील नागरिक भयभीत झाले आहेत. भटके कुत्रे या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. रात्रीच्या वेळी कामावरून येणार्या चाकरमानी भयभीत झाले आहेत. कुत्र्यांचे लोकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे या प्रकारांना नागरिक वैतागले आहेत. पालिकेने त्वरीत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत दांडेकर यांनी केली आहे.