रत्नागिरी (आरकेजी) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या मुद्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपाला रत्नागिरीमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला, अशी माहिती रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. पराग पाथरे यांनी दिली. या संपामुळे खासगी रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग दुपारपर्यंत बंद होता, तर केवळ आपत्कालीन सेवाच सुरू होती. याचा फटका रूग्णांना बसला. मात्र दुपारनंतर संप मागे घेतल्याने संध्याकाळी पुन्हा रूग्ण सेवा सुरू झाली आणि रूग्णांना दिलासा मिळाला.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा व सहभागाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप आयएमएने केला होता. ज्या समितीमध्ये डॉक्टरांचा सहभाग अधिक हवा त्यात बिगरवैद्यकीय व्यक्तींचा सहभाग वाढवण्यात आलेला आहे, ज्या देशामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक व तज्ञांना त्या क्षेत्राशी संबधित निर्णयप्रक्रियेमध्ये विश्वासाने सामावून घेतले जात नाही, तिथे रुग्णहित कसे जपले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करीत विधेयकाचा मसुदा हा गरीब रुग्णांच्या विरोधात असून याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला होता. या विधेयकामुळे भष्ट्राचार वाढेल. खाजगी वैद्यकीय कॉलेजवर कोणाचाही धाक राहणार नाही असे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र संघटनेच्या या म्हणण्याला शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने वर्षारंभीच आपली नाराजी दाखविताना आज मंगळवारी देशव्यापी संप पुकारला होता. सकाळी ६ वाजल्यापासून खासगी रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. केवळ आपत्कालीन सेवाच अनेक रूग्णालयामध्ये सुरू होती. याबाबत बोलताना डॉ. पराग पाथरे म्हणाले की रत्नागिरीमध्ये या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. तो विरोध आम्ही या संपाच्या माध्यमातुन दाखविला होता. मात्र राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत असल्याने आयएमएने डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय दुपारी घेतला आणि त्यानंतर रूग्णसेवा सुरू झाली असे डॉ. पाथरे यांनी सांगितले.