डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन शवविच्छेदन करण्यास शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी ठाम विरोध केला आहे. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवलीतील डॉक्टरांनी दगावलेल्या रुग्णांची शवचिकित्सा कल्याणमध्ये येऊन करावी अशी मागणी केली असून यामुळे डोंबिवलीतील डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कल्याण येथील रुग्णालयात 21 डॉक्टर्स आहेत तर डोंबिवलीत फक्त 13 डॉक्टर्स असून 125 डॉक्टरांच्या जागा असताना 75 जागा रिकाम्या असल्याचे डोंबिवलीतील डॉक्टरांचे मत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात फक्त रुक्मिणीबाई रुग्णालयात शवचिकित्सेची सोय असून तशी सोय डोंबिवलीतही करण्यात यावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सतत प्रयत्न करत असून त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मागणही केली होती.
कल्याणमधील डॉक्टरांवर कामाचा ताण पडत असून डोंबिवलीत दगावलेल्या रूग्णांची शवचिकित्सा कल्याणमध्ये येऊन करावी अशी मागणी कल्याणच्या डॉक्टंरानी केली आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने याबाबत डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये जास्त डॉक्टर असून गेल्या वर्षात म्हणजे 2017 मध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात 1,154 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. याचा विचार करता बारा तासांच्या कामाच्या वेळेत हे प्रमाण एक किंवा दोन होते. डोंबिवलीत मुळातच डॉक्टरांची संख्या कमी असताना जर शवविच्छेदनासाठी डॉक्टर कल्याणला गेल्यास येथील डॉक्टरांवर कामाचा ताण आणखीन वाढेल अशी भिती डॉक्टर्स व्यक्त करीत आहेत. जो वैद्यकीय अधिकारी अपघात कक्षात असतो त्यानेच शवचिकित्सा करणे आवश्यक असते. एका रुग्णालयातील डॉक्टरांनी दुसऱ्या रूग्णालयात जाऊन शवचिकित्सा करावी अशी पध्दत कुठेच नाही असे ज्येष्ठ अधिकारी सांगतात. डोंबिवलीत शवचिकित्सा केंद्र सुरु करावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून शासनाकडे पाठपुरावा सुरु असून जागेचाही शोध सुरु असल्याचे समोर येत आहे.