डोंबिवली : सक्षम बँकेसाठीचे सर्व निकष पूर्ण करत डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सभासदांच्या भाग भांडवलावर 12% लाभांश प्रस्तावित केला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी 4399/- कोटींपर्यंत पोहोचल्या, तर कर्ज व्यवहार 3273/- कोटींवर गेला. मार्च 2018 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 7672/- कोटी झाला. या आर्थिक वर्षात बँकेच्या सर्व गुंतवणूका 1499/- कोटी झाल्या आहेत तर भाग – भांडवल 128 /- कोटी झाले आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबर 2018 मध्ये होणार आहे.
बँक सक्षम राहण्यासाठी ढोबळ अनुत्पादित कर्जांचे (Gross NPA) गुणोत्तर 7 % पेक्षा कमी राखणे तसेच नक्त अनुत्पादित कर्जांचे (Net NPA) गुणोत्तर 3% पेक्षा कमी राखणे आवश्यक असते. बँकेने रिझर्व्ह बँकेचे हे दोन्ही निकष पूर्ण केले आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 12% हून अधिकच्या स्तरावर कायम राहिले आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या किमान 9%च्या मापदंडाच्या तुलनेत सदर प्रमाण हे अतिशय समाधानकारक आहे.
2017-18 या आर्थिक वर्षात, काल्हेर, विरार, इस्लामपूर, दापोली, महाड, मारूंजी, कामोठे व रांजणोली या शाखांचा शुभारंभ झाला. त्यामुळे डोंबिवली बँकेच्या शाखांची संख्या मार्च अखेरीस 65 होती. 2018-19 या चालू आर्थिक वर्षात बँकेने बावधन, आधारवाडी, कचोरे व करवले या चार नवीन शाखा सुरू केल्या असून अनगाव येथे बँकेची नवीन शाखा सुरू होणार असून बँकेला याही वर्षी ऑडिटवर्ग `अ’ मिळाला आहे.
बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब नेहमीच केला आहे. स्वत:च्या खात्याचे स्टेटमेंट डाऊनलोड करणे, स्वत:च मुदत ठेव खाते सुरू करणे इत्यादी विविध सेवा उपलब्ध करणारे डू मोबाईल प्लस हे अॅप्लिकेशन बँकेने नुकतेच सुरू केले आहे. त्याचप्रमाणेभीम (BHIM) व यु.पी.आय (UPI) या एन.पी.सी.आय. ने सादर केलेल्या अॅपचा वापर करून मोबाईलद्वारे व्यापारी देणी (Merchant Payments) देण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे. याद्वारे रेल्वे आरक्षण, मोबाईल तसेच डिटीएच रिचार्ज करणे, वीज बील, पाणी बिले अदा करणे शक्य झाले आहे.