डोंबिवली : दिवाळीचा पहिला दिवस आणि डोंबिवलीतीत फडके रस्ता यांचे वेगळे नाते असतं. या वर्षीही फडके रस्त्यावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. मराठी-हिंदी गाण्यांची जुगलबंदी, ढोल-ताशांचा गजर आणि दीपावलीच्या शुभेच्छांचा वर्षाव अशा संगीतमय वातावरणात डोंबिवलीकरांच्या दिवाळीचा पहिला दिवस उजाडला.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अभ्यंगस्नान करून, नवीन कपडे परिधान करून हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींसह ज्येष्ठ मंडळीही श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी फडके रस्त्यावर जमा झाले. मागील अनेक वर्षापासूनची ही परंपरा म्हणजे डोंबिवलीचा एक उत्सवच. पहाटेपासून फडके रस्त्यावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे तरुण-तरुणी पारंपरिक वेश परिधान करून नटूनथटून आल्या होत्या. तरुणींनी फॅशनेबल ड्रेसबरोबरच सहावारी, नऊवारी साडया नेसल्या होत्या. तरुणही शेरवानी वेशात होते. प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात तल्लीन होते. तरुण-तरुणींच्या अलोट गर्दीने गणेश मंदिर परिसरातील चारही बाजूंचे रस्ते फुलून गेले होते.
ढोलांच्या नादाने आसमंत दुमदुमला !
दिवाळीच्या स्वागतासाठी गर्जना, श्रीमंत, स्वरभ्रमांड, विठूमाऊली आदी ढोल पथकांनी फडके रस्त्यावर गर्दी केली होती. ढोलांच्या नादाने आसमंत दुमदूमून गेला. यावर तरुणाईची पावलेही थिरकू लागली. विशेष म्हणजे या ढोल पथकांत मुलींचाही सहभाग होता. मुलांच्या बरोबरीने तितक्याच उत्साहाने नऊवारी साडी परिधान करून वादन करीत होत्या.
गणेशमंदीर संस्थानाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्टार प्रवाहवरील विठू माऊली या कार्यक्रमातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ कार्यक्रमातील ईशा निमकर म्हणजे गायत्री दातार व याच मालिकेतील तिचा साहाय्यक कलाकार उपस्थित होता.
दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार :
युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळ समितीचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात उपस्थित मान्यवराच्या हस्ते अंध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे नागरिंकानी कौतुक करत होते. यावर्षी विशेष म्हंजे सेल्फी पॉईट वर तरुणवर्गाबरोबर जेष्ठांनीही गर्दी केली होती.
स्वरा गावडे आणि ६६ वर्षाच्या वर्षा चौधरी यांनी याठिकाणी काढलेल्या सेल्फीला पारितोषिके देण्यात आली. तर एक सोसायटी एक रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक शास्त्रीनगर परिसरातील शिवा आकांक्षा सोसायटी, दुसरा क्रमांक पॅनोरम सोसायटीला आणि तिसरा क्रमांक तुळशीराम जोशी चाळीला देण्यात आले. यावेळी काही अंध व्यक्तींचाही खास सत्कार करण्यात आला. मराठी कलाकारांचा वाद्यवृंद कार्यक्रम करण्यात आला होता. विशेष म्हणजे आयोजक अमित म्हात्रे यांनी अंध व्यक्तीबरोबर सेल्फी पॉईटवर सेल्फी काढली. यावेळी तरुणाईनेही गर्दी केली होती. पारांपारीक वेषात महिलांनी याठिकाणी हजेरी लावली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य संतोष केणे, माजी नगरसेविका रत्नप्रभा भास्कर म्हात्रे, काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर, वर्ष गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.