दिवा : दिवा शहरातील इमारतींना ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने गलिच्छ सांडपाण्याचा निचरा अनेक इमारतींच्या शेजारीच केला जातो. परिणामी यातून साथीच्या आजारांचे प्रमाण शहरात वाढत असून यावरील नियंत्रणासाठी दिव्यातील प्रत्येक सोसायटीच्या आवारात पावसाळ्यामध्ये डास नियंत्रक फवारणी करण्यात यावी अशी मागणी दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिवा शहरातील इमारतीना स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्था नाही. अनेक इमारती या एकमेकांना लागून बांधण्यात आल्या आहेत. इमारतीमधील सांडपाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने अनेक भागात सोसायटीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. इमारत परिसरात सांडपाणी साठून राहिल्याने यातून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत असून मलेरिया, डेंग्यू सारख्या आजरांना कारणीभूत ठरणारे डासांची उत्पत्ती होण्यास असे परिसर कारणीभूत ठरत आहेत. पालिका प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन दिवा शहरातील सर्वच रहिवासी सोसायटीच्या आवारात तातडीने डास नियंत्रक फवारणी करावी अशी मागणी दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी केली आहे. दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिका आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असेही मुंडे यांनी म्हटले आहे.