मुंबई : दिव्यांग व्यक्तींना मुंबईच्या रेल्वे लोकलमधून सुखरुप प्रवास करता यावा, धडधाकट व्यक्ती त्यांच्या डब्यात घूसू नये, यासाठी बनविण्यात आलेल्या जनजागृतीपर लघुपटाचे उद्घाटन आज करण्यात आले. फोकस फाऊंडेशन या पत्रकारांच्या संघटनेने त्याची निर्मिती केली आहे.
आरपीएफ पोलीस महासंचालक अतुलकुमार श्रीवास्तव आणि प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आरपीएफ मुख्यालयात या लघुपटाचे अनावरण केले. रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रणवकुमार, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे, प्रहार रेल अपंग संघटनेचे नितीन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
दररोज लाखो प्रवासी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करतात. प्रचंड गर्दीची कसरत पार पाडत चाकरमानी दररोज या प्रवासाचा अनुभव घेत असतात. दिव्यांग व्यक्तीही या लोकलमधून प्रवास करतात. त्यांच्यासाठी स्वंतत्र डबा आरक्षीत करण्यात आला आहे. तरिही त्यांच्या डब्यात इतर ड्ब्यांच्या तुलनेने कमी गर्दी असल्याने धडधाकट प्रवाशीही बसतात. त्यामुळे दिव्यांगांना डब्यात प्रवेश करता येत नाही आणि केला तरी बसता येत नाही. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल कारवाई करतात पण ती तोकडीच ठरते. त्यासाठी प्रवाशांमध्येच जनजागृती करण्याच्या उद्देशाने दोन मिनिटांचा हा लघुपट बनविण्यात आला आहे.
दरम्यान, फोकस फाऊंडेशनने या आधी मुंबई पोलिसांसाठी तसेच आरपीएफसाठी निर्मिती केलेले लघुपट यावेळी दाखवण्यात आले. अतुलकुमार श्रीवास्तव यांनी रेल्वेसाठी तयार केलेल्या या फिल्मचे कौतुक केले. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तसेच जिथे जिथे दाखविणे शक्य आहे तिथे तिचे प्रक्षेपण करू, असे ते म्हणाले. फिल्म तर मोठ्या असतात पण त्यातून समाजप्रबोधन होत नाही. पत्रकारांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दिव्यांगासाठी केलेले हे काम अभिनंदनास पात्र आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. या फिल्म मध्ये पत्रकार प्रशांत अंकुशराव, मनोज कुळकर्णी, दयाशंकर पांडे, प्रशांत बढे, संतोष पांडे, मयूर राणे, राजेश गुप्ता, सुधीर राणे यांनी तर बाल कलाकार म्हणून श्रीनिधी पारटे हिने काम केले आहे.