मुंबई : बाळासाहेब ठाकरे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेला शुक्रवारी महापालिका सभागृहाची मंजूरी देण्यात आली. दिव्यांगांच्या मदतीसाठी शिवसेनेने ही ठरावाची सूचना मांडली होती. या सूचनेला मंजुरी मिळाल्याने मुंबईतील दिव्यांगाना लवकरच पालिकेकडून पेन्शन, सवलतीत कर्ज आणि शिष्यवृत्ती अशा सुविधा मिळणार आहेत.
जन्मत: दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अर्थसहाय्य योजना सुरू करण्याबाबत सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांनी ठरावाची सूचना मांडली होती. जन्मतःच दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आयुष्यभर परावलंबी जीवन जगावे लागते. या परिस्थितीत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचीही जबाबदारीही पार पाडावी लागते. राज्य शासन, महापालिका यांच्या स्तरावर दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी लाभदायक अशा विविध योजना राबविण्यात येतात. परंतु काही दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगाना दरमहा आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधा देता येईल अशी सहाय्यकारी योजना राबविणे गरजेचे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या विकासासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करावी अशी मागणी लांडे यांनी केली होती. सभागृहात या सूचनेला मंजुरी मिळाली असून प्रशासनाच्या अभिप्रायानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, कल्याण व नाशिक या छोट्या महापालिकांकडून आपापल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना अर्थसहाय्य, पेन्शन, शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेकडून मात्र अशा योजना राबवल्या जात नाहीत. त्यामुळे कल्याण, नाशिक महापालिकांच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी योजना राबवा अशी मागणी मामा लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती, याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.