रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तीचा मानसिक, सामाजिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासन कटीबध्द असून शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्य केले जात आहे. त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी रोजगारभिमुख साहित्य देखील देण्यात येते, असे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले.
अल्पबचत सभागृह येथे समाजकल्याण विभागामार्फत ३ टक्के जि.प. सेस अंतर्गत दिव्यांग लाभार्थी अर्थसहाय्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
दिव्यांगानी आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हावे यासाठी शासकीय कार्यालयाच्या आवारात व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तीना स्वंयरोजगारासाठी आवश्यक असलेल्या सहाय्यभूत साधनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., आस्था फाऊंडेशनच्या संचालिका सुरेखा जोशी तसेच लाभार्थी उपस्थित होते.
बागायती रोपमळयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
बागायती रोपमळ्याचे बळकटीकरण करणे या योजनेतंतर्गत हायटेक नर्सरी उभारणी कामाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते हातखंबा येथे उद्घाटन झाले.
यावेळी पालकमंत्री यांनी फळरोपवाटीका मधील फळ झाडांची पहाणी केली. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपुजन
समुद्र धूपप्रतिबंधक बंधारे योजने अंतर्गत पोंमेडी येथे धूपप्रतिबंधक बंधाराचे भूमिपुजन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते संपन्न झाले. ८२ लक्ष रुपयांच्या या बंधाऱ्याचे काम येत्या काळात सुरु होणार आहे.