दिवा : दिवा विभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने दिवा विभागात तीव्र पाणी टंचाई जाणवते. मात्र येत्या काही दिवसात संपूर्ण दिवा विभागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. दिवा पश्चिमेकडील क्रिश कॉलनी एन.आर.नगर येथे आमदार निधीतून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. दिवा विभागात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून साबे व दिवा विभागाकरिता नवीन जलवाहिनी टाकण्याकरिता 16 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवा पश्चिमेकडील जलवाहिन्याकरिता 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणि दिवा विभागाकरिता 5 द.ल.ली. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने येत्या काही दिवसात दिवा विभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी दिवा विभागात आमदार निधीतून अडीच कोटी रुपये खर्च करून विकासकामे केल्याची माहिती उपस्थितांना दिली.
दिवा विभागातील क्रिश कॉलनी एन.आर.नगर येथे जलवाहिनीकरिता आमदार निधीतून 15 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून त्याच्या भूमिपूजन प्रसंगी विधानसभा संघटक ब्रम्हाशेठ पाटील, उपशहर प्रमुख व नगरसेवक शैलेश पाटील, क्रीडा समिती सभापती अमर पाटील, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपाली भगत, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, समाजसेवक संजय म्हात्रे, संतोष म्हात्रे, अरुण म्हात्रे, दत्ताञय म्हात्रे, युवासेनेचे अभिषेक ठाकूर, आशिष भोईर, परेश म्हात्रे, आशिष शिंदे, महिला आघाडी अनिता गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.