
मुंबई, प्रतिनिधी : कोकणातील पर्यावरण, रोजगार, शिक्षण, आरोग्य, मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १३ जून २०२६ रोजी मुंबईत ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजता दादर (पूर्व) येथील प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे होणार आहे.
जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्ष, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोकण प्रदेशासमोर आज अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. परप्रांतियांकडून वाढती जमीन खरेदी, रिफायनरी व अणुऊर्जा प्रकल्प, नियोजित ग्रीन एक्सप्रेस वे, स्थानिक रोजगाराचा अभाव, शिक्षण व आरोग्य सुविधांची कमतरता, रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, पर्यावरणाचा ऱ्हास, वैध-अवैध खाणकाम, परप्रांतीय ट्रॉलर्सकडून होणारी मासेमारीची लूट तसेच शेती आणि पर्यटन व्यवसायासमोरील अडचणी या विषयांवर परिसंवादात सविस्तर चर्चा होणार आहे.
कोकणातील प्रश्नांची मांडणी करून त्यावर उपाययोजनांबाबत जनजागृती करणे आणि व्यापक लोकचळवळ उभी करणे हा या परिसंवादाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कोकणासमोरील प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाकर नारकर, संजय परब, जगदीश नलावडे, सुरेश रासम, ऍड. प्रशांत गायकवाड, पत्रकार काशीनाथ म्हादे, भूषण भिसे, यतीन तोंडवळकर, संजीवकुमार सदानंद, केतन कदम, विश्वास उटगी, दिनेश राणे, चित्रा राणे, डॉ. उत्तम महाडकर, सुरेश रासम, जयंत दिवाण, ॲड. गिरीशकुमार कटारिया, किशोर केदार, जगदीश पाटणकर, विजय परब, ॲड. निरंजनी शेट्टी, संभाजी भोसले, रमेश बोरीचा, जनार्दन जंगले, राजन नेरुरकर, डॉ. आनंद कासले, नितीन माळी, शिवराम सुकी, दिनार कवीश्वर, घनश्याम अंबोकर, साजिद शेख, गणेश शिर्के, उल्हास चौधरी, ललिता सोनावणे, रविंद्र निकाळे, गौतम साळवे, अमर जोशी, लालजी कोरी आणि विनोद गायकवाड यांनी केले आहे.















