मुंबई, शुक्रवार : मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य व ज्येष्ठ संपादक श्री. दिनकर रायकर यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारितेतील कडा कोसळला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आपला शोक व्यक्त केला.
दिनकर रायकर हे अत्यंत मृदू स्वभावाचे हसतमुख व्यिक्तमत्त्व होते. तरुण पत्रकारांना मदत करण्यात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात ते सदैव पुढे असत. इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता आणि लोकमत यासारख्या अग्रगण्य दैनिकातून संपादकीय पदाच्या मोठ्या जबाबदाऱ्या रायकर यांनी लिलया पेलल्या. बॅ. अ. र. अंतुले मुख्यमंत्री असताना राज्यातील सुरक्षा रक्षकांसाठी बोर्ड बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कै. रायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडून करून घेतले. सर्वसामान्य लोकांना मदत करण्यात ते सदैव आघाडीवर असत. त्यांच्या निधनाने इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली.