
रत्नागिरी : समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजनांचा लाभ मागासवर्गीय समाजातील घटकांना मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या कामाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बन्ने, तहसिलदार वैशाली माने आदि उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार येथील जनतेला ज्या गोष्टींची गरज आहे त्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकारी वर्गांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचत आहे की नाही हे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पुनर्वसनामुळे बाधित झालेल्या कुटूंबाच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात. तसेच त्यांना देण्यात येणारे दाखले देण्यासाठी काही अडचणी येत असतील त्या दूर करुन त्यांना दाखले देण्यात यावेत असेही ते म्हणाले.
या बैठकीसाठी विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.















