रत्नागिरी : जिल्ह्यातील शाळांनी डिजीटल शिक्षणाची कास धरली आहे. जिल्ह्यातील तब्बल २ हजार २१६ शाळांमध्ये डिजीटल क्लासरूम सुरू करण्यात आल्या असून या ठिकाणी एलसीडी प्रोजेक्टरसह कॉम्प्युटर आणि टॅब मोबाईलद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. डिजीटल शाळा करण्यात गुहागर तालुका आघाडीवर असून या ताुलक्यातील शंभर टक्के शाळा डिजीटल बनल्या आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतिसाठी कार्यक्रम निर्धारित करण्यात आला. यामध्ये एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावर निश्चित करण्यात आली. अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगति करण्यासाठी कृतीशील अध्ययन पध्दतीचा वापर करून शिक्षकांनी स्वच्छेने उपक्रम राबवून अप्रगत विद्यार्थीहीन शाळा तयार करण्याच्या सूचना शिक्षण खात्याकडून करण्यात आल्या होत्या.
अप्रगत विद्यार्थीहीन शाळा घडवण्यासाठी डीजीटल क्लासरूम, एबीएल आणि बाला इव्हेंट्स (शाळेची इमारत ही एक शैक्षणिक साधन) या सारखे कृतीशील उपक्रम हाती घेण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. याची जिल्ह्यातील शाळांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या २ हजार २१६ शाळांमध्ये डिजीटल क्लासरूम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर आणि टॅब मोबाईलच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. डिजीटल क्लासरूममध्ये एससीडी प्रोजेक्टर, कॉम्प्युटर आणि टॅब मोबाईलच्या साहाय्याने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. डिजीटल शाळा घडवण्यात गुहागर तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. खेडमधील २०४ पैकी २०४ शाळा डिजीटल बनल्या आहेत. डिजीटल शिक्षण पध्दतीत मंडणगड तालुका पिछाडीवर आहे. मंडणगड तालुक्यातील १६३ पैकी केवळ ३१ शाळा डिजीटल बनल्या आहेत तर १३२ शाळा अद्यापही वेटींगवर आहेत. दापोलीतील २८२ पैकी २२५ शाळा, खेडमधील ३६७ पैकी ३३० शाळा, चिपळूण ३६३ पैकी २८७, संगमेश्वर ३९२ पैकी ३६६ शाळा, रत्नागिरीतील ३३३ पैकी २९८, लांजा २२५ पैकी केवळ १६० आणि राजापुर तालुक्यातील ३५९ पैकी केवळ ३१३ शाळांनी डिजीटल शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी केली आहे.