कोल्हापूर : शहर सौंदर्यीकरणाचा भाग या दृष्टीकोनातूनच पोलीस मुख्यालयाच्या बागेचा विकास करुन ते प्रेक्षणीय करावे. शहरात येणारा पर्यटक या ठिकाणाला आर्वजून भेट देईल यासाठी या जागेचा पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. या दृष्टीने वाघाबॉर्डर नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फुट उंचीचा ध्वजस्तंभ या ठिकाणी उभारण्यात आला असून या ध्वजस्तंभाचे उद्घाटन १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथूर, सिनेअभिनेते अक्षयकुमार यांच्या उपस्थित उद्घाटन होणार आहे. सबंध कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभियानाचा हा ऐतिहासिक क्षण हृदयात साठवण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पोलीस मुख्यालयातील विकसीत करण्यात येत असलेला बगीचा व ध्वजस्तंभ यांची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, सहायक पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, प्रशिक्षानार्थी पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवाटक्के, पोलीस उपधिक्षक सतीश माने, पोलीस उपधिक्षक भारतकुमार राणे, निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर केएसबीपीचे जॉय पित्रे, संदीप देसाई, महेश जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहु छत्रपती शाहु महाराज यांनी जी स्थळे विकसीत केली त्यानंतर आजपर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने फारसा विकास झाला नाही, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केला जात आहे. केएसबीपीच्या माध्यमातून शहरातील रोड डिव्हायडर आणि चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होत असून शहराला देखणे रुप येत आहे. पोलीस मुख्यालयाच्या गार्डनचे मुख्य आकर्षण हा ३०३ फुट उंचीचा ध्वजस्तंभ व त्यावर सदैव डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज हा असणार आहे. वाघा बॉर्डरवरील ध्वजस्तंभानंतरचा हा देशातील दुसरा सर्वात उंच ध्वजस्तंभ असणार आहे. या व्यतिरिक्त देखील या गार्डनमध्ये उत्तम दर्जाचे फौंटन, स्वातंत्र्य लढ्याची यशोगाथा सांगणारे म्युरल्स, पोलीस संग्रहालय आदीबाबी या ठिकाणी असणार आहेत.
१ मे रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि सिनेअभिनेते अक्षयकुमार यांच्या उपस्थित उद्घाटन होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी पोलीस वेलफेअर नाईट कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठीही जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे. या कार्यक्रमातून उभा राहणारा निधी पोलीस कल्याणासाठी उपयोगात येणार असल्याने या कार्यक्रमाची तिकिटेही लोकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.