मुंबई : राज्यात धर्मांतराचे तुरळक प्रकार आढळून आले आहेत. यासंदर्भात चर्चा घडवून राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तयार करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येईल. वरूड येथील धर्मांतराच्या तक्रार प्रकरणी १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल, येथील अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
वरूड (जि. अमरावती ) येथील आदिवासी भागात ख्रिश्चन धर्म प्रसारकांकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्राम गीताचार्य तुकारामदादा यांचे छायाचित्र वापरून नागरीकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केल्याबाबत सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, याप्रकरणी सदस्य डॉ. बोंडे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी सदर तक्रार अर्ज वरूड पोलिस ठाण्याकडे चौकशीसाठी पाठविला आहे त्यात तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेतील एका उपप्रश्नाला उत्तर देतांना राज्यमंत्री केसरकर म्हणाले की, राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात नाही. त्यावर चर्चा घडवून कायदा तयार करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. जयप्रकाश मुंदडा, अतुल भातखळकर यांनी भाग घेतला.