
रत्नागिरी, (आरकेजी) : स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही देशातील काही भागात पायाभूत सुविधांची असलेली वानवा गुहागर तालुक्यातील रानवी-धोपावे रस्त्याच्या दूरवस्थेने दाखवून दिली आहे. मागील दहा वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्यासाठी लढा देत आहेत, परंतू, लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही येथे दुर्लक्ष केले आहे. खराब रस्त्यामुळे एसटी प्रशासनाकडून बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यासह ग्रामस्थाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासन लक्ष देत नसल्याने साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सुमारे अठराशे लोकवस्तीचे धोपावे गाव आहे. येथून दाभोळ येथील फेरीबोटीकडे सहा किलोमीटरचा रस्ता जातो. या रस्त्यावरून गाडीच काय चालणं देखील कठीण होऊन बसले आहे. रस्ता योग्य नसल्याने एसटीची सुविधाच बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावात येण्यासाठी सहा किमीची पायपीट करावी लागत आहे. हा रस्ता सहा किमीचा असूनही मे पर्यंत फक्त ५०० मीटरचाच होईल, असे अजब उत्तर प्रशासनाने दिले आहे. त्यासाठी दहा लाखांच्या निधीची तरतूद देखील केली जाणार आहे. परंतु, उर्वरीत रस्त्याचे काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अर्ज, विनंत्या आणि राजकीय नेत्यांकडे जाऊन रस्ता होत नसल्याने १ मेपासून ग्रामस्थ साखळी उपोषण करणार आहेत.
















