मुंबई : भारतातील ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्रात उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयातर्फे मुंबईत आज एका चर्चात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान या चर्चासत्रात सहभागी झाले. या क्षेत्रात आवश्यक महत्वपूर्ण सुधारणांबाबत त्यांनी प्रामुख्याने माहिती दिली.
काही उच्च स्तरीय धोरणांमधे बदलांच्या माध्यमातून देशातील तेल आणि वायुच्या उत्पादनात वाढ शक्य असल्याचे प्रधान यांनी यावेळी सांगितले. ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशातील उद्योग जगतातील अग्रणींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सत्रात पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव के.डी.त्रिपाठी सुद्ध सहभागी झाले. तेल आणि वायुच्या नव्या संशोधनासाठी मंत्रालयातर्फे, राबवण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी अर्थात हेल्पच्या माध्यमातून तेल आणि वायू क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अभुतपूर्व संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.