
मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील
मुंबई : संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील (८०) यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. जे.जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विष प्राशन केले होते. मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे पाटीलच्या नशिबी अखेरपर्यंत निराशाच आली. दरम्यान योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतक-याचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्यल्याची भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथिल शेतकरी धर्मा पाटील यांनी गेल्या २२ तारखेला रात्री उशीरा मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांच्यावर जे.जे रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून उपचार करण्यात येत होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीस करण्यात आले होते. धर्मा पाटील यांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येणार आहेत. जमिनीचा योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्याची भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला. तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते