नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांतल्या जलसाठ्यांमध्ये ११ मे २०१७ रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्यांनी घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये ३७.७१८ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी २४ टक्के जलसाठा आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १५७.७९९ अब्ज घनमीटर इतकी आहे. ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर ६० मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये २७ धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता २७.०७ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या ७.७८ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी २९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पंजाब, राजस्थान, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा उपलब्ध आहे.