मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) कडून या महिन्याअखेरच अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ.विकास महात्मे उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सकडून याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल ऑगस्टअखेरीसच मागविला आहे. टाटा इन्स्टिट्यूटने अनेक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो अहवाल या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच सरकार त्यावर तत्काळ कार्यवाही करेल. धनगर समाजाच्या मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी शासन याबाबत सकारात्मक असून तशी भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडण्यात येईल. समाजातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देणार आहे. रोगांनी किंवा विषबाधेने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळण्याबाबतची विमा योजना सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आदिवासी विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता व धनगर समाज संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.