रत्नागिरी, (आरकेजी) : सहकारी कर्मचार्यावर अन्याय झाला, असा आरोप करत देवरुख एसटी आगारातील वाहकांनी बुधवारी रिबुक होणे बंद केले. यामुळे दिवसभरात ३५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
देवरुख आगारातील एका चालकाचा १५ दिवसापूर्वी अपघात घडला होता. त्याचे म्हणणे ऐकून घेण्याआधीच मंगळवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रशासन नियमात वागते, मग आम्हीसुद्धा नियमात काम करणार असे वाहकानी सांगितले आणि रिबुक होणे बंद केले.
आगारात नियमित कारभार चालवण्यासाठी १३३ वाहकांची गरज असते प्रत्यक्षात १२७ जण कार्यरत आहेत. त्यातील काही जण नियमित रजेवर असल्याने ३५ वाहकाना रिबुक व्हावे लागते. त्यांच्याकडून ४० फेऱ्या चालवल्या जातात. आज सकाळपासून एकही वाहक रिबुक न झाल्याने दिवसभरातील ३५ बसफेऱ्या रद्द झाल्या. याचा फटका शेकडो प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बसला. मुसळधार पावसात चार चार तास प्रवासी एसटीची वाट बघत उभे होते. साखरपा – संगमेश्वर – माखजन बस स्थानकातील प्रवाशांनाही या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहक नियमित फेऱ्या चालवत असले तरी त्या दिड ते दोन तास उशीराने सुरु आहेत. आता वाहक कमी झाल्याने आगारातून सुटणाऱ्या १५ ठिकाणच्या फेऱ्या अडचणीत सापडल्या आहेत.