रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) ): जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीत सादर न केल्यामुळे देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज अवैध ठरलेल्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत बुधवारी सुनावणी होऊन, न्यायालयाने सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरवले. त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.
अर्ज भरण्याच्या अंतिम दिनी २ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व १३ नगरसेवक पदाचे १४ अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरविण्यात आले होते. या सर्व अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी १९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत न जोडल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी अविषकुमार सोनाने यांनी हे अर्ज अपात्र ठरवले होते. अपात्र उमेदवारांपैकी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार स्मिता लाड यांसह अवैध ठरलेल्या काही उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणाबाबत २६ रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात अवैध ठरलेल्या उमेदवारांची अपात्रता ही तांत्रिक मुद्यांवर असल्यामुळे सोमवारी न्यायालयाने थेट या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वकीलांनी २ एप्रिल ही तारीख दुरची ठरत आहे. तसेच निवडणुक ६ रोजी होणार असल्यामुळे सुनावणी व मतदानातील कालावधी अल्प राहत असल्यामुळे न्यायालयाकडे विनवणी करून यापुर्वीची सुनावणीची तारीख मागितली.
जिल्हा सत्र न्यायालयाने या अर्जाचा विचार करून २८ रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले़ त्यानुसार सुनावणी पार पडली़ यावेळी न्यायालयाने सर्वच्या सर्व म्हणजेच २ नगराध्यक्षपदाचे उमेदवार व १३ नगरसेवक पदाचे १४ अर्ज वैध ठरवले. न्यायालयाच्या या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार राहिलेल्या सर्वच उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे़ दरम्यान, या निकालामुळे निवडणुकीत मात्र चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.